संजय राऊतांची मोदी सरकारकडे चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची मागणी


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी केली आहे. शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने ते शिवसेना फार गांभीर्याने घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या विधानाचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले आहे.

राऊत यांना रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले की, केंद्राचा एखादा मंत्री जर अशी माहिती देत असेल तर चीन आणि पाकिस्तानावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर बाहेरच्या शक्ती आपल्या देशात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने हे वक्तव्य शिवसेना फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे.

संपूर्ण देश चिंतेत आहे की सिंघू बॉर्डरवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. खरच सरकारला तोडगा काढायचा असता तर यावर तोडगा निघाला असता. पण हा विषय बहुधा सरकारला असाच लोंबकळत ठेवायचा आहे. महाराष्ट्र, पंजाब तसेच इतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सारख्याच आहेत. कायदा आणि शेतीच्या कायद्यात सरकारला काही बदल हवे असतील तर त्यांनी सर्वात आधी भाजपशासित राज्यांमधून सुरुवात करावी. तिकडे प्रयोग करावा, काय परिमाण होतो ते पाहता येईल आणि त्यानंतर इतर राज्य कायदा स्वीकारतील. कदाचित पंजाबही स्वीकारेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.