कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी नाकारली


नवी दिल्ली: कोरोनाच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना परवानगी देण्यास औषध नियमकांनी नकार दिला आहे. लसीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल अधिक माहिती देण्याच्या सूचना दोन्ही लस उत्पादकांना देण्यात आल्या आहेत.

सेंट्रल ड्रग्‍स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विशेषज्ञ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोना महासाथीच्या काळात या लसीचा आपत्कालीन वापर करण्याची परवानगी सिरम, फायझर आणि भारत बायोटेक यांनी मागितली होती. या लसींना परवानगी देण्यासाठी पुरेशी माहिती देण्यात आली नाही, असे कारण देण्यात आले. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याची सविस्तर माहिती देण्याची मागणी नियमकांनी केली आहे.

शासकीय पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणयासाठी अनेक बैठक घेण्यात येतात. ही प्रक्रिया पूर्ण होऊन एक- दोन आठवड्यात लसीच्या वापरला परवानगी मिळू शकेल, असा विश्वास ‘सिरम’च्या सूत्रांनी व्यक्त केला.