वॉशिंग्टन – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातलेले असून कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून जगभरामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच महासत्ता अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका होतानाचे चित्र अनेकदा पहायला मिळाले.
अमेरिकेतील नागरिकांना कोरोना झाला हे उत्तम झाले – डोनाल्ड ट्रम्प
पण असे असतानाच कोरोनासंदर्भात आपल्या सरकारने चांगले काम केल्याचा दावा अनेकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी या कालावधीमध्ये चीनवर टीका करण्याबरोबरच केलेली अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असेच एक वक्तव्य केले आहे. यावेळेस त्यांनी नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासंदर्भात भाष्य करताना, अमेरिकेतील नागरिकांना कोरोनाची लागण झाली हे एका अर्थाने उत्तम असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांना पत्रकारांशी संवाद साधताना कोरोनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी त्यावेळेस अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला हे उत्तम आहे, कारण कोरोनाचा संसर्ग होणे ही एका अर्थाने सर्वात शक्तीशाली लस असल्याचे मत व्यक्त केले आहे. व्हाइट हाऊसमध्ये मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी कोरोनाची लस निर्माण करणे हे आमचे पहिले उद्दीष्ट होते. लस निर्मितीला प्राधान्य असले तरी जसा काळ लोटत आहे, त्याप्रमाणे अनेकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.
माझ्या माहितीप्रमाणे कोरोनाचा अमेरिकेतील १५ टक्के नागरिकांना संसर्ग झाला आहे. हे उत्तम असून संसर्ग होणे ही सर्वात शक्तीशाली लस असल्यासारखेच असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य हे हर्ड इम्युनिटीच्या पार्श्वभूमीवर होते. हर्ड इम्युनिटी म्हणजेच बहुतांश व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होत नाही.