‘एनआयए’कडून सोळा विदेशी भारतीयांवर खलिस्तानप्रकरणी आरोपपत्र


नवी दिल्ली: खलिस्तानच्या स्थापनेसाठी देशद्रोही कारवाया करणे, प्रादेशिक आणि धार्मिक भावना भडकावणे, समाजात तेढ निर्माण करणे यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विदेशात राहणाऱ्या १६ जणांवर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

यापैकी ७ जण अमेरिकेत, ६ ब्रिटन येथे तर तिघे कॅनडा येथे आहेत. खलिस्तानच्या निर्मितीसाठी जनमत तयार करण्याच्या ‘रेफरेंडम २०२०’ या मोहिमेअंतर्गत देशविघातक कट कारस्थाने करण्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. ‘एनआयए’ विशेष न्यायालयात त्यांच्यावर विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण ‘सिखस फॉर जस्टीस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेचे सदस्य आहेत.

खलिस्तानच्या निर्मितीसाठी विदेशातून सूत्र हलविण्याचे काम या संघटनेमार्फत केले जाते. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये संघटनेची कार्यालये आहेत. मानवाधिकार संघटनेच्या बुरख्याआडून खलिस्तानच्या स्थापनेसाठी दहशतवादी कारवाया या संघटनेमार्फत केल्या जातात. या संघटनेला पाकिस्तानचा पाठींबा आहे. खलिस्तानला पाठींबा मिळविण्यासाठी या संघटनेकडून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍप युट्युब चॅनेल्स अशा समाजमाध्यमांचा आणि अनेक वेबसाईट्सचा वापर केला जातो. विशेषतः युवकांमध्ये खलिस्तानची बीजे रुजविणे, धर्म आणि प्रांत याच्या आधारे द्वेष पसरविणे आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे असे उद्योग ही संघटना करते.

भारतीय लष्करातील शीख बांधवांच्या मनात खलिस्तानच्या उभारणीसाठी भारताविरोधात बंडाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि काश्मीरमधील युवकांमध्ये फुटीरतावाद भडकावणे अशा करावयाची ही संघटना करीत असल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.