झकास सोलर इलेक्ट्रिक कार, एका चार्ज मध्ये धावणार १६०० किमी

फोटो साभार नवभारत

अपेट्रा पॅराडीगम या अमेरिकन कंपनीने नवी सोलर पॉवर्ड इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारची बॅटरी सूर्यप्रकाशाने चार्ज होणार आहे आणि एका चार्ज मध्ये ही कार चक्क १६०० किमीचा प्रवास करू शकणार आहे. म्हणजे एकदा कार खरेदीचा खर्च केला की दिल्ली ते मुंबई प्रवास अजिबात इंधन खर्च न करता येणार आहे.

आज जगभरातील बहुतेक सर्व ऑटो कंपन्या फ्युअललेस व इलेक्ट्रिक मोबिलिटी यावर काम करत आहेत. भविष्यात अश्या वाहनांना पर्याय राहणार नाही आणि वाहने सर्वाना परवडतील अश्या शिवाय सर्वाना सोयीच्या ठरतील अश्या विविध मॉडेल्स मध्ये बनविणे हे या कंपन्यांना मोठे आव्हान आहे. त्यामुळे अपेट्रा पॅराडीगमने सादर केलेली ही कार कुतूहलाचा विषय ठरली आहे.

सूर्यप्रकाश सहज शोषला जाईल आणि बॅटरी चार्ज होईल या प्रकारे या कारचे डिझाईन बनविले गेले आहे. ही तीन चाकी कार दोन सिटर आहे. एखाद्या छोट्या जेट फ्लाईट प्रमाणे ती दिसते. एका वर्षात ११००० मैल म्हणजे १७७०० किमी ही कार चालविता येईल. तिच्या बॅटरीची क्षमता २५.० केडब्ल्यूएच पासून १००.० केडब्ल्यूएच अशी आहे. ग्राहकांना कुठलाही पॅक घेता येणार आहे.

ग्राहकांना १०० केडब्ल्यूएच फ्रंट व्हील ड्राईव्ह सिस्टीम मॉडेल वा १५० केडब्ल्यूएच ऑल व्हील ड्राईव्ह पॉवर ट्रेन मॉडेल असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ही कार ० ते १०० किमीचा वेग ५ सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी १७७ किमी. अमेरिकन बाजारात तिची किंमत २५९९९ डॉलर्स म्हणजे भातीय रुपयात १९.१० लाख इतकी आहे.