म्हणून त्रिकोणाकारात बांधली जाणार नवी संसद
फोटो साभार नवभारत टाईम्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज म्हणजे १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असून देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने भूमिपूजन कार्यक्रमाला परवानगी दिली असली तरी इमारत बांधकाम सुरु करू नये असे आदेश दिले आहेत. इमारत बांधकाम कंत्राटावरून न्यायालयात याचिका दाखल केली गेली असून तिचा निकाल लागेपर्यंत बांधकाम सुरु करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
संसदेची नवी इमारत प्रत्येक कोनातून सुंदर व्हावी याची पूर्ण काळजी बांधकाम आराखडा तयार करताना घेतली गेली आहे. नवे संसद भवन त्रिकोणाकार असून वास्तू विशारदांनी या इमारतीचा आराखडा तयार करण्यापूर्वी जगातील नामवंत संसद भवनाच्या इमारतीचे निरीक्षण करून हा आराखडा बनविला आहे असे समजते.
नवे संसद भवन बांधताना भारताच्या प्राचीन वैदिक पद्धतीचा आधार घेतला गेला आहे. वैदिक आकृत्या मध्ये त्रिकोणाचे आगळे महत्व आहे. तांत्रिक अनुष्ठानात त्रिभुज आकृत्यांचे फार महत्व आहे. याच आकृत्यांमध्ये अनुष्ठाने पूर्ण केली जातात. त्याच उद्देशाने देशाच्या प्रगतीमध्ये नव्या संसद भवनाचे सहाय्य राहावे यासाठी त्रिकोणाकार इमारतीचा आराखडा बनविला गेला आहे. टाटा प्रोजेक्टर लिमिटेड कंपनीने या साठी ८६१.९० कोटीची बोली लावून कंत्राट मिळविले आहे.
एक वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले जाणार असून प्राचीन आराखडा आणि अत्याधुनिक सोयी सुविधा यामुळे ही इमारत बांधकाम होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. या इमारतीच्या आराखड्याचे फोटो प्रसिध्द झाले आहेत.