निती आयोगाच्या सीईओंवर भडकल्या सुप्रिया सुळे; प्रशासकीय अधिकाऱ्याचे वक्तव्य धक्कादायक


मुंबई -निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे कठीण असल्याचे वक्तव्य केले आहे. चीनशी स्पर्धा कठोर सुधारणांशिवाय करणे सोपे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याचे हे अतिशय बेजबाबदार वक्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले असून, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे की, भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध.भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


देशातील अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे कठीण असून आणखी सुधारणांची देशाला स्पर्धात्मक करण्यासाठी आवश्यकता आहे, पण देशात असलेल्या अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे अवघड जाते. राजकीय इच्छाशक्तीची अशा सुधारणांसाठी गरज असते. या सरकारने त्या करण्याची इच्छाशक्ती दर्शवली असल्याचे कांत यांनी म्हटले आहे. सर्वच क्षेत्रांत कठोर सुधारणा केंद्र सरकार करीत असल्याचे कांत यांनी प्रथमच ‘स्वराज्य’ नियतकालिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, खणिकर्म, कोळसा, कामगार, कृषीसह जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात येत असून त्या राबवणे कठीण जात आहे.

राज्यांनी सुधारणांची पुढील लाट निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून कांत म्हणाले, १०-१२ राज्यांनी जर विकासदराचा उच्चांक साधला, तर भारतीय उच्च विकासदर गाठण्यात मागे का पडतात, असा प्रश्नच निर्माण होणार नाही. आम्ही केंद्रशासित प्रदेशांना वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे वीजवितरण कंपन्या अधिक स्पर्धात्मक बनतील आणि स्वस्त विजेचा पुरवठा करतील, असेही कांत यांनी सांगितले. देशात विजेच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या स्रोताबाबत कांत म्हणाले की, लिथियमची कमतरता आहे, असे म्हणता येत नाही. कारण ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जगात लिथियम मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे.