दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या


चेन्नईतील एका हॉटेलमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीजे चित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप चित्राच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. ती केवळ २८ वर्षांची होती. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये चित्राने काम केले होते.

यासंदर्भात ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत चित्राचा साखरपुडा झाला होता. हे दोघे त्यानंतर एकत्रदेखील रहात होते. पण चित्राने अचानकपणे आत्महत्या केली. चित्राने चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये गळफास घेतला. चित्राने हे पाऊल नैराश्य आल्यामुळे उचलल्याचे सध्या तरी सांगण्यात येत आहे. चित्रा रात्री २.३० वाजता इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचे हेमंतने सांगितले.

चित्रा चित्रिकरण संपल्यावर हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. ती बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्यामुळे मी दार वाजवले. पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती हेमंतने पोलिसांना दिली. चित्राची ‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती. मुलई ही भूमिका या मालिकेत तिने साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती. तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.