मुंबई:- बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने केली. यासंदर्भातील माहिती त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. मी आता गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरु असलेला प्रवास थांबवत असल्याचे सांगताना माझे मन भरून आले आहे. त्याचबरोबर मी अनेकांचा ऋणीही आहे. एका 17 वर्षांच्या मुलाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघात स्थान देण्याचा विश्वास दाखवला. बीसीसीआयने माझ्या कारकीर्दीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आभारी असल्याचे पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पार्थिव पटेलची निवृत्ती!
— parthiv patel (@parthiv9) December 9, 2020
आतापर्यंत २५ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये ३५ वर्षीय पार्थिव पटेलने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पार्थिवला फारशी संधी भारतीय संघाकडून मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचे १९४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. पार्थिव पटेलने २००२ साली वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
सुरुवातीची काही वर्ष चांगला खेळ केल्यानंतर पार्थिवच्या कामगिरीत घसरण झाली. यानंतर २००४ साली दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या आगमनानंतर पार्थिवने संघातील आपली जागा गमावली. भारतीय संघाकडून संधी मिळत नसली तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिव खेळत होता.