एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकालला अटक


मुंबई – अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक मोठी कारवाई केली आहे. मिलत नगर, लोखंडवाला भागात या प्रकरणी एनसीबीने छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. महाकाल ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला ड्रग्जचा पुरवठा करत असे. त्यानंतर हे ड्रग्ज केशवाणी पुढे दुसऱ्यांना पुरवत असल्याचे एनसीबीने सांगितले आहे. एनसीबीने बुधवारी सकाळी ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे ही छापेमारी केली. यामध्ये महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.