आम्ही तिघे एकत्र लढल्यास भाजपला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत ; जयंत पाटील


पुणे: महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी राज्यात आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढल्यास भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाटील यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले आहे. आता मिशन मुंबईचा नारा भाजपने दिला आहे. पाटील यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. महाविकास आघाडी आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढली, तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत. राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असेही त्यांनी पुढे नमूद केले.