अहमदाबाद – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषि विधेयकांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रूपाणी यांनी टोला लगावताना, राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधील फरक कळतो?, असा खोचक प्रश्न विचारला आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला काँग्रेसने पाठिंबा दर्शवत केंद्राने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी भूमिका घेतली आहे. रूपाणी यांनी याचवरुन मेहसाणा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका केली.
राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधील फरक कळतो का ? – विजय रुपानी
ज्या सुधारणांची वकीली काँग्रेस करायची त्यालाच आज काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींना मी विचारु इच्छितो, कोथिंबीर आणि मेथीमधील फरक तुम्हाला कळतो का?, असे म्हणत रूपाणी यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. मेहसाणा येथे २८७ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमामध्ये रूपाणी हे बोलत होते.
काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आल्यास एपीएमसी कायद्यामध्ये बदल करु आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या बाजारपेठांच्या बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देऊ. आता हाच बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे तर काँग्रेस याचा विरोध का करत असल्याचा प्रश्न रूपाणी यांनी उपस्थित केला. तसेच, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींनी एक बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी एपीएमसीमधून भाज्या आणि फळांना हटवण्यात यावे. असे केल्यास त्यांच्या किंमती कमी होतील, असे मत व्यक्त केले होते. शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या उद्देशाने आता हा निर्णय घेण्यात आला आहे, तर काँग्रेस त्याचा विरोध करत आहे. अशी भूमिका काँग्रेसने का घेतली आहे, लोकांना याचे उत्तर हवे असल्याचेही रूपाणी पुढे म्हणाले.