शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र, यामागे चीन आणि पाकचा हात – रावसाहेब दानवे


नवी दिल्ली – देशभरातून दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना या दरम्यान एक धक्कादायक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला असून शेतकऱ्यांचे हे आंदोलन नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या आंदोलना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हे जे काही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून यामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदा या देशामध्ये मुस्लीम समाजाला उकसवले आणि सांगितले मुस्लिमांना सीएए आणि एनआरसीमुळे देशातून बाहेर जावं लागेल. त्यानंतर एखादा तरी मुसलमान देशाबाहेर गेला का? अशी विचारणाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी केली. त्यांना वाटले हे यशस्वी होणार नसल्यामुळे आता सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचे षडयंत्र आहे. याचा विचार आपल्या देशातील शेतकऱ्यांनी केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. राजू शेट्टी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, किती मस्ती आणि उन्माद भाजपच्या नेत्यांना आहे हे रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था दानवे स्वत: पाहतात. जबाबदारीने त्यांनी बोलणे अपेक्षित आहे. दिल्लीत पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी येऊन आंदोलन करत आहेत म्हणजे यावरुन शेतकऱ्यांसाठी भाजपच्या काय भावना आहेत हे दिसून येते असून हे निषेधार्ह आहे.

भाजपचे सर्व नेते वगळून या देशातील सगळी जनताच पाकिस्तानी आणि चिनी आहे का असा संशय येऊ लागला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे परिस्थिती बिघडू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी आंदोलन करत आहेत मग ५६ इंच छाती असणारे पंतप्रधान कुठे आहेत ? असा सवालही त्यांनी विचारला.