अमेरिका, भारतानंतर आता चीनने कोरोनाच्या प्रसारासाठी ऑस्ट्रेलियाला धरले जबाबदार


बिजिंग – कोरोना व्हायरसने काही महिन्यापूर्वी जगभरात थैमान घालण्यास सुरूवात केली. त्यानतंर कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही जगभरात कायम आहे. यावरील लस विकसित करण्याचे अनेक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण चीनने अशा परिस्थितीतही अमेरिका आणि त्यानंतर भारतावर कोरोनाचा प्रादुर्भाव पसरवल्याचा आरोप केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वुहानमध्ये पसरण्यापूर्वी इटलीसोबतच जगाच्या इतर भागात कोरोना विषाणू पसरल्याचा दावाही चीनने केला होता. परंतु चीनने आता ऑस्ट्रेलियाला कोरोनाच्या प्रसारासाठी जबाबदार धरले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप आता चीनने केला आहे. फ्रोझन मीटवर गेल्या काही महिन्यांमध्ये काही चाचण्या करण्यात आल्या. फ्रोझन मीटवरून चीन सातत्याने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांवर कोरोना पसवल्याचा आरोप करत आला होता. पण चीनला हे सिद्ध करण्यात मात्र अपयश आले आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार चीन नाही तर ऑस्ट्रेलियातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा विषाणू चीनच्या वुहान बाजारापर्यंत फ्रोझन फूडच्या माध्यमातून पोहोचल्याचाही दावा करण्यात आला आहे. चीनने यापूर्वी अनेकदा कोणत्याही पुराव्यांशिवाय फ्रोझन फूडवरून अन्य देशांवर कोरोनाचा प्रादुर्भाव पसवल्याचा आरोप केला आहे.

ग्लोबल टाईम्सने हे दावे सिद्ध करण्यासाठी अधिक पुराव्यांची गरज असल्याचेही म्हटले आहे. चीनने यापूर्वीदेखील केलेल्या दाव्यांप्रमाणेच यावेळीही आरोप सिद्ध करण्यासाठी चीनकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान मार्केटमधूनच सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मांस विक्री मोठ्य़ा प्रमाणात केली जाते.

ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार चीनमध्ये कोरोनाची निर्मिती झाली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाशिवाय ब्राझील आणि जर्मनीलाही चीनने जबाबदार धरले होते. कोरोना विषाणू चीनमध्ये ब्राझील आणि जर्मनीमधून येणाऱ्या मांसामुळे पोहोचल्याचा दावा करण्यात आल्यानंतर कोरोना विषाणू २०१९ च्या उन्हाळ्याच्या कालावधीत भारतात निर्माण झाल्याचा ‘चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या वैज्ञानिकांच्या एका टीमनं दावा केला होता.

तसेच या विषाणूने प्राण्यांपासून दुषित पाण्याच्या माध्यमातून मानवात प्रवेश केला. परंतु त्यानंतर वुहानमध्ये तो विषाणू पोहोचल्यानंतर कोरोनाची पहिल्यांदा ओळख पटवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. चीनच्या टीमने आपल्या सर्वेक्षणात कोरोना विषाणूचा स्त्रोत माहित करून घेण्यासाठी फिलोजेनेटिक विश्लेषणाचा आधार घेतला होता. पण त्यांचा काही वैज्ञानिकांनी दावा खोडला होता.