३३ कोटी लोकसंख्या, ३०० कोटी पार्सल, नाताळसाठी ऑनलाईन कंपन्याची कामगिरी
फोटो साभार इकोनॉमिक टाईम्स
नाताळ हा पाश्चिमात्य देशात मोठ्या धामधुमीने साजरा केला जाणारा मोठा सण. या काळात गिफ्ट देणे घेणे याला फार महत्व असते आणि नाताळ निमित्त मोठ्या सुट्या असतात. या दिवसात ई कॉमर्स वेबसाईटवर एकच ट्राफिक उसळला असल्याचे दिसून येत आहे. करोना मुळे लोक घरबसल्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. परिणामी ई कॉमर्स कंपन्याच्या पुढे नाताळ साठी आत्ताच ३०० कोटी पार्सल वेळेत पोहोचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा आकडा फक्त अमेरिकेतील असून अमेरिकेची लोकसंख्या आहे ३३ कोटी. यावरून अमेरिकन लोकांनी किती दणकून खरेदी केली आहे याची सहज कल्पना करता येते.
विशेष म्हणजे जसजसा नाताळ जवळ येतो आहे तशी पार्सल संख्या वाढत चालली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत ८० कोटी जादा पार्सल आहेत. अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर असल्याने ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय खुपच वाढला असून देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा हातभार लागणार आहेच पण नाताळ पूर्वी पार्सल डिलीव्हरी झाली नाही तर ऑर्डर रद्द होण्याच्या धोकाही निर्माण झाला आहे. परिणामी नुकसान सोसावे लागण्याची पाळी येऊ शकेल.
मोर्गन स्टॅनलेचे परिवहन विश्लेषक रविशंकर म्हणाले ई कॉमर्स कंपन्यांवर डिलीव्हरी देण्याचा मोठा तणाव असून सुटीच्या दिवशीही काम केले जात आहे. अनेक कंपन्यांनी हजारो नवीन कर्मचारी भरती केले आहेत आणि रोज सरासरी ७२ लाखाहून अधिक डिलीव्हरी दिल्या जात आहेत. तरीही प्रत्येकाला वेळेत डिलीव्हरी देणे अवघड बनणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगला व्यवसाय मिळाला असला तरी छोट्या रिटेल स्टोर्सना मात्र त्याचा फटाका बसला आहे कारण खुपच कमी संखेने ग्राहक खरेदीसाठी दुकानात जात आहेत.