लग्झमबर्ग गुजराथेत सुरु करणार करोना लस कोल्ड स्टोरेज सुविधा
फोटो साभार मिंट
छोटासा देश लग्झमबर्ग मधील बी मेडिकल सिस्टीम भारतात कोविड १९ लसीसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी गुजराथ राज्याच्या विचार केला जात असल्याचे समजते. या कंपनीचे सीइओ एल प्रोवास्ट यांनी मार्च पर्यंत भारतात ही सुविधा सुरु होईल असे सांगितले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि तेलंगाना सरकारनेही कंपनीशी संपर्क साधला असल्याचेही सांगितले जात आहे.
जगभरात अनेक कंपन्या करोना वरील कोविड १९ प्रतिबंधक लस उत्पादनात उतरल्या आहेत आणि काही देशात लसीकरण सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही देशातील प्रत्येक नागरिकाला कोविड १९ लस मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. पण सर्वात मोठा अडथळा ही लस ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज सुविधा हीच आहे. बी मेडिकल सिस्टीमचे प्रमुख एल प्रोवास्ट आणि उपप्रमुख जे दोशी दोघेही सध्या कोल्ड स्टोरेज सुविधा तंत्रज्ञान भारतात स्थानांतरित करण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत.
यावेळी दोशी यांनी गुजरात मध्ये साईट शोधत असल्याची माहिती दिली असून ते म्हणजे मार्च २०२१ पर्यंत ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालय कोविड १९ लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेऊन आहे. १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्झमबर्ग शिखर बैठकीत दोन्ही देशात आर्थिक आदानप्रदान वाढविण्याची क्षमता असल्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये सांगितले होते. त्यानुसार दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढविण्यासाठीच्या योजनांवर विचार करत आहेत असे समजते.