एलियन्स अस्तित्वात असल्याचा इस्रायली अधिकाऱ्याचा दावा
फोटो साभार गार्डियन
एलियन्स म्हणजे परग्रहवासी अस्तित्वात आहेत का नाहीत याची चर्चा नेहमीच होत असली तरी त्यांच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे अजून जगासमोर आलेले नाहीत. इस्त्रायलच्या अंतर्गत सुरक्षा प्रोग्रामचे माजी प्रमुख हाइम इशेद यांनी मात्र एलियन्स आहेत आणि अमेरिका आणि इस्रायलशी त्यांचा गुप्त संपर्क असल्याचा दावा केला आहे.
येरुशालेम पोस्ट या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत इशेद यांनी इस्रायल आणि अमेरिका दीर्घकाळ एलियन्स सोबत काम करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले एलियन्सचे अस्तित्व रहस्यमय राहिले आहे कारण माणूस अजून त्यासाठी तयार नाही. ईशेद यांच्या दाव्यानुसार एलियन्सचे गेलेस्टीक फेडरेशन आहे. या संस्थेने १९८१ ते २०१० या काळात अंतर्गत सुरक्षा कार्यक्रमाला हातभार लावला आहे.
इशेद यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांनी एलियन्स उपस्थितीचा खुलासा करण्याचे ठरविले होते पण एलियन्सनी त्यांना थांबविले. इशेद कधीही एलियन्सच्या अस्तित्वाचे पुरावे देण्यास तयार आहेत. ते म्हणाले एलियन्स दीर्घकाळ आपल्यात आहेत. एलियन्सने अमेरिकन सरकार बरोबर करार केला असून त्यानुसार त्यांचे प्रयोग सुरु आहेत.
एलियन्सचा मंगळावर भूमिगत स्पेस बेस असून तेथे अमेरिकी अंतराळवीर आणि एलियन्स एकत्र काम करत आहेत असाही दावा इशेद यांनी केला आहे.