शेतकरी नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक


नवी दिल्ली – आज देशभरात ठिकठिकाणी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांनी आज सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे भारत बंदची हाक दिली होती. आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावली असल्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

भारत बंदसोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले असून आज देशभरात भारत बंद पाळण्यात आल्यानंतर आता सरकार आणि शेतकऱ्यांच्या उद्या होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्याच्या बैठकीपूर्वीच तातडीची बैठक बोलावली आहे. सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषि विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीची माहिती भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी दिली आहे. सकाळी अमित शाह यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ही बैठक अनौपचारिक असणार आहे. या बैठकीत १३ सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.