असा असेल देशातील कोरोना लसीकरणाचा आराखडा; एक व्यक्तीसाठी लागणार अर्धा तास


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनावर मात करणारी लस अखेर दृष्टीपथात आली असून जगभरातील सहा कोटीहून अधिक नागरिकांना आतापर्यंत या व्हायरसची लागण झाली आहे. तर या व्हायरसमुळे पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या आजाराला रोखण्याच सध्यातरी लस हाच एकमेव मार्ग आहे. एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील देशवासियांना आता लसीची जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नसल्याचे सांगितले.

कोव्हिशिल्ड लसीच्या आपातकालीन वापरासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने परवानगी मागितलेली असताना आता स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीसाठी अशाच प्रकारची परवानगी भारत बायोटेकनेही मागितली आहे. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपातकालीन वापरासाठी अमेरिकन कंपनी फायझरने सुद्धा अर्ज केला आहे.

पहिल्यांदा कोरोना लसीचा डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. सरकारी आणि खासगी क्षेत्राकडून त्यासाठी डाटा मागवण्यात आला आहे. हा अंतिम आराखडा कोरोना लसी संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने तयार केला आहे. तज्ज्ञ समितीला राज्यांनी जो डाटा दिला आहे, त्यानुसार पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला एक कोटी फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस मिळेल, असे इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले होते.

लसीचा डोस प्रत्येक नागरिकाला देण्यासंदर्भात सरकारने काही मार्गदर्शकतत्वे आखली असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसला सरकारी सूत्रांनी दिली आहे. मार्गदर्शकतत्त्वानुसार तीन स्वतंत्र खोल्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर असतील. लसीचा डोस ज्याला मिळणार आहे, तो पहिल्या रुममध्ये थांबेल. दुसऱ्या रुममध्ये प्रत्यक्ष लसीचा डोस दिला जाईल.

लसीचा डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या रुममध्ये प्रत्येक नागरिकाला तीस मिनिटे थांबावे लागेल. कारण काही प्रतिकुल परिणाम शरीरावर होत आहे का? हे त्याठिकाणी तपासले जाईल. प्रत्येक सेशनमध्ये लसीचे १०० डोस दिले जातील. ३० मिनिटे एका व्यक्तीच्या लसीकरणाला लागतील, असे सूत्रांनी सांगितले

कोविन आयटी सिस्टिमचा वापर लसीकरणासाठी करण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांचा जो डाटा राज्यांकडून मिळाला आहे, तो सध्या कोविनच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचे काम सुरु आहे. स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत, तर डॉ. रेड्डी लॅबने रशियन लस स्पुटनिक व्ही चाचण्या सुरु केल्या आहेत.

फायझरच्या लसीला आपातकालीन वापराची यूके, बहरीन आणि अन्य देशात मान्यता मिळाली आहे. त्यांनी भारतातही अर्ज केला आहे. ९५ टक्के ही कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फायझरची लस स्टोअर करणे एक मोठे आव्हान आहे. तशा प्रकारचे तापमान मेन्टेन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाही.