नवीन वर्षापासून ‘या’ दिग्गज आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार !


बंगळूरू: देशासह जगावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या दरम्यान सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्याचबरोबर काहींना आपल्या नोकऱ्या टिकवणे महत्वाचे बनले होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्याला पगार वाढ मिळेल अशी अपेक्षा करणे सध्यातरी दुरापास्त आहे. पण या संकटकाळामध्ये देखील एका दिग्गज आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नववर्षापासून वेतनवाढ मिळणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने घेतला आहे. त्यानुसार कनिष्ठ श्रेणीतील (बी ३ आणि त्या खालील) कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे.

१ जानेवारीपासून कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तर १ जूनपासून मध्यम श्रेणीतील (सी १ आणि त्यावरील) कर्मचाऱ्यांच्या वेतनात वेतनवाढ केली जाणार आहे. या वेतनवाढीचा फायदा बी ३ या श्रेणीच्या १.८ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याव्यतिरिक्त उत्तम कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीदेखील देण्यात येणार आहे. ऑफ-शोअर कर्मचाऱ्यांना ६ ते ८ टक्के आणि नॉन साईट स्टाफला ३ ते ४ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. साधारणत: जून महिन्यापासून विप्रोची वार्षिक वेतन वाढ ही प्रभावीपणे लागू करण्यात येते.

या कठीण काळातही निरंतर सेवा पुरवण्यासोबत सेवेच्या मापदंडांनाही आमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीत आणि चौथ्या तिमाहीत विप्रोने सर्व कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के व्हेरिएबल पेची घोषणा केली असल्याची माहिती कंपनीने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. विप्रोने यावर्षी ६ जुलै रोजी थिएरी डेलापोर्ट यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली होती. आतापर्यंत थिएरी एकदाही कार्यालयात गेले नाहीत. पण कंपनीशी ते जोडले गेल्यापासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

त्यांनी जुलैपासून आतापर्यंत विप्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयाचा एकदाही दौरा केला नाही. पण ते व्हर्च्युअल बैठकांद्वारे कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. विप्रोचे शेअर्स ६ जुलै रोजी २२० रूपयांवर होते. पण थिएरी कंपनीशी जोडले गेल्यानंतर शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात विप्रोच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांची वाढ होऊन ते ३८१ रूपयांपर्यंत ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरापर्यंत पोहोचले होते.