रोहित पवारांनी ‘लोकल’ने प्रवास करत जागवल्या जुन्या आठवणी


मुंबई – पुन्हा एकदा मुंबई लोकलने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रवास केला आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच आपल्या सहकाऱ्यांशी आमदार रोहित पवार वागतात. अनेकदा ते आपले साधारण वागणे सोशल मीडियातून कार्यकर्त्यांसाठी शेअर करत असतात. मग, एखाद्या आजीच्या घरी जाऊन जेवण करणे असेल किंवा सहजच एखाद्या दुकानात जाऊन खेळणी खरेदी करणे असेल. आता, रोहित पवारांनी पुन्हा एकदा लोकल प्रवास करत कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत.

त्यांनी याचे फोटो ट्विट करत असे म्हटले आहे, की मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलने प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलने प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो.


विशेष म्हणजे रोहित पवार यांनी यापूर्वीही मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला होता. त्यावेळी, एक दिवस मी त्यांच्यातील डबेवाला बनल्याचे सांगताना, डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव रोहित यांनी शेअर केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ही लोकलसेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण अद्यापही सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यातच, लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्वीप्रमाणे सुरू व्हावी, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.