दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना घरातच केले नरजकैद, आपचा गंभीर आरोप


नवी दिल्ली – शेतकऱ्याचे केंद्रीय कृषि विधेयकांविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज (मंगळवारी) 12 वा दिवस आहे. त्याचबरोबर आज या विधेयकांविरोधात देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. शेतकरी कृषि विधेयक मागे घेण्याची मागणी करत दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करत सोमवारी सकाळी सिंघु सीमेवर दाखल झाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच नरजकैद केले आहे.

दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर पुरवण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर आजच्या ‘भारत बंद’चं समर्थन करत असल्याचे याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच स्थानबद्द केले आहे. कोणालाही त्यांच्या घरी जाऊ दिले जात नाही, त्याचबरोबर घरातून बाहेर त्यांनाही पडू दिले जात नाही. ज्या आमदारांनी केजरीवाल यांच्यासमवेत सोमवारी बैठक घेतली, पोलिसांकडून त्या आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजपाचे कार्यकर्तेच नजर ठेऊन बसल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

भाजपने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने तिन्ही महापालिकांच्या महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलनास बसवले आहे. दिल्ली पोलिसांना या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. एकप्रकारे भाजपने केजरीवाल यांना घरातच स्थानबद्ध करण्याचे काम दिल्ली पोलिसांच्या मदतीने केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचा आरोप दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंटो अल्फोस यांनी फेटाळून लावला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांवर केलेला आरोप बिनबुडाचा असून अरविंद केजरीवाल हे सोमवारी रात्रीही घराबाहेर पडले होते. ते रात्री 10 वाजता घरी परतल्याचेही अल्फोस यांनी सांगितले.