WHO फाऊंडेशनच्या सीईओ पदी भारतीय वंशाचे अनिल सोनींची नियुक्ती


नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना नियुक्त करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी केली आहे. या संघटनेचे अनिल सोनी हे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.

१ जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार अनिल सोनी यांच्याकडे दिला जाणार आहे. या दरम्यान त्यांचे लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान मे २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती. अनिल सोनी हे आतापर्यंत ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिससोबत कार्यरत होते. ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून ते वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.


दरम्यान, अनिल सोनी यांच्या कार्याची जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी स्तुती केली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सोनी हे नवे प्रयोग करणारे असल्याचेही म्हटले आहे. संपूर्ण जग आज कठीण वेळेतून पुढे जात आहे. अशात त्यांचे नवे विचार त्याचा सामना करण्याची संधी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही अनिल सोनी हे कार्यरत होते. त्यांनी या ठिकाणी २००५ ते २०१० या कालावधीत सेवा बजावली. सोनी यांनी याव्यतिरिक्त बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागाचाही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.