सुवर्णपदक विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने उघड केले गुपित

फोटो साभार जागरण

भारताची लांब उडी क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक विजेती स्टार खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने १७ वर्षानंतर तिच्या यशाबाबत एक गुपित उघड केले असून त्यामुळे तिच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला आहे. २००३ च्या पॅरीस येथील विश्व अॅथलेट चँपियन स्पर्धेत कांस्य तर २००५ च्या मोनाको स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या अंजूने हे सारे यश तिने कोणत्या परिस्थितीत मिळविले हे गुपित उघड केले आहे. अंजूला एकच किडनी आहे आणि तरीही तिने हे यश मेहनतीने खेचून आणले आहे.

अंजू सांगते, तिला एकच किडनी आहे शिवाय वेदनाशामक औषधांची तिला अॅलर्जी आहे. या सर्व अडचणींवर मात करून तिने यशश्री खेचून आणली. ती म्हणते एकच किडनी असलेल्या काही लोकांनी जगात मोठी कामगिरी केलेली आहे आणि मी त्यातील एक आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. अर्थात यात प्रशिक्षकाची भूमिका खुपच महत्वाची होती असेही तिला वाटते. तिचे पती बॉबी रोबर्ट जॉर्ज हेच तिचे प्रशिक्षक होते. त्याच्यामुळे माझ्या करियरला अधिक उंची मिळाली असे तिने सांगितले.

ट्विटरवर क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी अंजूने कष्ट, मेहनत, धैर्य आणि खेळाप्रती प्रतिबद्धता दाखवून देशाची मान उंच केल्याचे आणि त्यात प्रशिक्षक, तंत्रज्ञ याचे मोठे सहकार्य तिला मिळाल्याचे म्हटले आहे. भारतीय अॅथलेट महासंघ अधिकारी सांगतात २००३ विश्व चँपियन स्पर्धेत अंजू देशाची एकमेव पदक विजेती होती आणि २००५ स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले, अंजू देशासाठी प्रेरणादायी खेळाडू आहे.

२००४ ऑलिम्पिक मध्ये अंजू सहाव्या स्थानावर होती पण अमेरिकेच्या मरियान जोन्स हिला डोपिंग मुळे अयोग्य ठरविले गेल्यावर अंजू पाचव्या स्थानी आली होती.