या सुंदर बेटावर फोटो, सेल्फी काढले तर मिळू शकतो मृत्युदंड

जगभरातील प्रवासी आणि भटके नित्यनवीन सुंदर पर्यटन स्थळांच्या शोधात असतात. अश्या ठिकाणी फोटो काढणे आणि ते शेअर करणे हाही आजकाल अनेकांचा छंद झाला आहे. जगभरातील पर्यटनस्थळांच्या यादीत थायलंड मधील फुकेत बेट बऱ्याच वरच्या स्थानावर आहे आणि वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र या बेटावर काही नियम थोडे विचित्र वाटतील असे आहेत. त्यातील एक म्हणजे या बेटावर सेल्फी किंवा फोटो काढायला बंदी केली गेली असून फोटो काढणे हा गुन्हा मानला गेला आहे. इतकेच नव्हे तर हा गुन्हा करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.

नुसता फोटो किंवा सेल्फी काढली म्हणून मृत्युदंड हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण त्या मागचे कारण तसेच महत्वाचे आहे. हा नियम पर्यटक, प्रवासी यांची सुरक्षा लक्षात घेऊन बनविला गेला आहे. या बेटाच्या जवळ विमानतळ आहे आणि रोज शेकडो विमाने येथून ये जा करतात. या ठिकाणी विमाने अगदी खालून उडतात. त्यामुळे वैमानिकाला समुद्र किनाऱ्यावरची सगळी दृश्ये अगदी स्पष्ट दिसतात.

आता पर्यटक जर विविध प्रकारे सेल्फी, फोटो घेत असतील तर पायलटला ते दिसणार आणि एखादेवेळी जरी त्याचे लक्ष या फोटोमुळे विचलित झाले, तर त्याचे विमानावरचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. यामुळे केवळ विमानातीलच नाही तर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर जाताना मोबाईल किंवा कॅमेरा बाजूला ठेऊन जावे लागते. ही हरकत कुणी करू नये म्हणून जागोजाग सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत.