या विशालकाय हिमनगामुळे पेंग्विन, सीलना जीवाला धोका

फोटो साभार जागरण

एका अति विशालकाय हिमनगामुळे अन्टार्टीका जवळील ब्रिटीश वसाहतीवर संकटाचे ढग गोळा झाले आहेत. जगातील सर्वात मोठा, ट्रिलियन पौंड वजनाचा एक हिमनग या वसाहतीच्या दिशेने प्रवास करत असून त्यामुळे या भागातील पेंग्विन पक्षी आणि सील मासे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युरोपीय स्पेस एजन्सी या हिमनगावर बारीक नजर ठेऊन आहे.

१२ जुलै २०१७ मध्ये अन्टार्टीकाच्या विशाल लार्सन सी आईसशेल पासून हा हीमनग वेगळा झाला होता. गेल्या महिन्यात तो अटलांटिक मध्ये साउथ ऑर्कने जवळ दिसला त्यावेळी त्याचे आणखी काही तुकडे झाले होते. हे तुकडे दुसरीकडे वाहत गेले आहेत. या वेळेपर्यंत या हिमनगाने १०५० किमी प्रवास केला होता. अजूनही या हिमनगाचा आकार अवाढव्य आहे. कॉपरनिकस सेंटीनलचा एक उपग्रह या हिमनगाचे ट्रॅकिंग करतो आहे. या हिमनगाला ए -६८ असे नाव दिले गेले आहे.

५ जुलै २०२० मध्ये या हिमनगाच्या प्रवासाला तीन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा आकार आणि वजनाची कल्पना येऊ लागली आहे. तो साउथ जॉर्जिया, सेंडविच आयलंड कडे सरकत असून हा ब्रिटीश ओवरशीट टेरेटरी आहे. हा प्रदेश १६७ किमी लांब आणि ३७ किमी रुंद असून येथे हजारो पेंग्विन आणि सील मासे आहेत. हिमनग या बेटाला थडकला तर पेंग्विन आणि सील नष्ट होऊ शकतील अशी भीती आहे.