कोविड लसीची होऊ शकते लुट, इंटरपोलचा इशारा

फोटो साभार एपी ७ एएम

गेले आठ नऊ महिने जगाला वेठीला ठरलेल्या कोविड १९ विषाणू साठी प्रतिबंधक लस तयार होत असून अनेक देशांनी लसीकरणाचे कार्यक्रम हाती घेतले असतानाच गुन्हेगारी टोळ्या कोविड १९ लसीच्या लुटीचा कट आखत असल्याची माहिती इंटरपोलला मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी जगभरातील देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

ब्रिटन मध्ये आज म्हणजे मंगळवारपासून कोविड १९ लसीकरण सुरु होत असून देशातील ५० सरकारी रुग्णालयात त्यासाठी तयारी केली गेली आहे. याच दरम्यान इंटरपोल गुप्तचर संस्थेचा नवा अहवाल समोर आला असून त्यात वाहतूक करताना कोविड लसीची लुट होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. ब्रिटनने इंटरपोलचा इशारा गंभीरपणे घेतला असून कोविड १९ लस हॉस्पिटल पर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. मिडिया रिपोर्ट नुसार ब्रिटनने लसीसाठी सुरक्षा वाढविली आहे.

ब्रिटीश मिडीयाने कोविड १९ लसीचे नामकरण लिक्विड गोल्ड असे केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार  या लसीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस सिस्टीम लावली गेली आहे. शिवाय लॉकिंग सिस्टीम, अलार्म याची काळजी घेतली गेली आहे. ब्रिटन मध्ये सेंट्रल मॉनिटरिंग स्टेशन सुद्धा उभारले गेले आहे. शिवाय ५० हजार पोलीस तैनात केले गेले आहेत. १४ हजार सैनिक स्टँडबाय स्थितीत आहेत. इंटरपोलने असाच इशारा अन्य देशांना ही दिला असल्याचे समजते. गुन्हेगारी टोळ्या लस पुरवठ्यात अडथळे आणू शकतील अशी भीती इंटरपोल ने व्यक्त केली आहे.