सीरम इन्स्टिट्यूटने केंद्राकडे मागितली कोव्हिशिल्डच्या आपत्कालीन वापराची परवानगी


पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने डीसीजीआयकडे ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. सीरम ही कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी देशातील पहिली कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महामारी दरम्यान, विस्तृत स्तरावर वैद्यकीय गरजा आणि जनहित यांचा हवाला देत सीरमने कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. तत्पूर्वी याआधी शनिवारी अमेरिकी औषध निर्माती कंपनी फायझरने केंद्र सरकारकडे भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.

फायझरला गेल्याच आठवड्यात ब्रिटन आणि बहारीनने लसीकरणाला परवानगी दिली आहे. ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून या लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. या कंपनीने आता भारतात लसीकरणासाठी तात्काळ परवानगी मागितली आहे. भारत सरकार याला कसा प्रतिसाद देतो ते पहावे लागेल. तसेच रविवारी देशाच्या विविध भागात एसआयआयने आयसीएमआरसोबत एकत्र येऊन ऑक्सफर्डच्या कोरोना लस ‘कोव्हिशिल्ड’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परीक्षण केले.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुत्रांनी अधिकृत माहिती दिली की, ते एसआयआयच्या अर्जाचा हवाला देऊन म्हणाले की, कंपनीने सांगितले आहे की, क्लिनिकल परीक्षणाच्या चार डेटामध्ये हे समोर आले आहे की, कोव्हिशिल्ड कोरोनाची लक्षण असणाऱ्या रुग्णांमध्ये खासकरुन कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये खास प्रभावी ठरते. चारपैकी दोन चाचण्यांचा डेटा ब्रिटन आणि एक-एक भारत आणि ब्राझीलशी संबंधित आहे.