सरकारची भूमिका आईची असली पाहिजे, शेतकऱ्याला आरोपी ठरवू नका, त्याला समजून घ्या – राजू शेट्टी


मुंबई – आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करताना रस्ते रोखले. झाडे आडवी टाकली, टायर पेटवले पण रस्ता खोदण्याचे धाडस आम्ही कधीच केले नव्हते. पण रस्त्यावर सरकारनेच खंदक खोदून दिल्लीच्या दिशेने येणारे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखल्याचे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. त्याचबरोबर त्यांच्या मनात मनात काय आहे?. पण सध्या त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी आंदोलनाला प्रांतिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असून कुठल्या जाती-धर्माचे हे आंदोलन नसून देशातील शेतकऱ्यांचे असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

जी तीन कृषि विधेयक सरकारने मंजूर केली. कुठल्याही शेतकऱ्याने किंवा शेतकरी संघटनेने त्या विधेयकांची मागणी केली नव्हती. जगाची अर्थव्यवस्था लॉकडाऊनमध्ये कोलमडली. त्याला आपला देशही अपवाद नव्हता.पण या काळात शेती क्षेत्र स्थिर होते. त्यावेळीच हा बिझनेस कॉर्पोरेट हाऊसेसना दिसला. शेती क्षेत्रात अदानी-अंबानी यांना व्यापार करता यावा, त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे झालेले त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी पायघडया घालून ही तीन विधेयके मंजूर केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांवर सरकार लाठीहल्ला करत आहे, पाण्याचा फवारा मारत असल्यामुळे परिस्थिती चिघळत आहे. शेतकरी अशांत झाला तर देश अशांत होईल. हे आंदोलन फक्त पंजाब, हरयाणा आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे नाही. हे आंदोलन संपूर्ण देशाचे आहे. सरकारने याचे भान ठेवावे. सरकारची भूमिका आईची असली पाहिजे . शेतकऱ्याला आरोपी ठरवू नये. त्याला समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची माथी भडकली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राजू शेट्टी म्हणाले.

उद्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ भारत बंदची हाक दिली आहे. देशातील जनतेने त्या बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभागी व्हावे. सर्वांनी एक दिवस बळी राजासाठी म्हणून सहभाग घेतल्यास, केंद्र सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल. तसेच मी उद्या कोल्हापूर येथे सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.