संशोधन; शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या Molnupiravir औषधामुळे 24 तासांमध्ये बरा होणार कोरोनाबाधित


नवी दिल्ली – मागील अनेक महिन्यांपासून देशासह जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर या संकटावर तोडगा म्हणून आतापर्यंत तरी कोणत्याही अचूक औषधाची निर्मिती झालेली नाही. जगभरातील अनेक देश कोरोना प्रतिबंधक लस बनविण्याचा प्रयत्न करता असतानाच याच दरम्यान वैज्ञानिकांना एक असे औषध सापडले आहे, ज्यामुळे अवघ्या 24 तासात एखादा रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतो. या औषधावर संशोधन करणाऱ्या संशोधकाचा असा दावा आहे कि, हे अँटी-व्हायरल औषध पूर्णपणे कोरोना नष्ट करू शकते. MK-4482/EIDD-2801असे या औषधाचे नाव आहे, ज्याला सोप्या भाषेत मोल्नुपीरावीर (Molnupiravir) असेही म्हणतात.

जर्नल ऑफ नेचर मायक्रोबायोलॉजीमध्ये (Journal Nature Microbiology) प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना रूग्णांना फक्त संसर्ग पसरण्यापासूनच रोखत नाही तर पुढील गंभीर आजारांना मोल्नुपीरावीर प्रतिबंधित करू शकते. या अभ्यासाचे लेखक रिचर्ड प्लंपर याबाबत माहिती देताना सांगतात की, पहिल्यांदाच कोरोनावर उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेतले जाणारे औषध आणले जात आहे. कोरोनाच्या उपचारात MK-4482/EIDD-2801 गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमने हे औषध शोधले आहे. हे औषध सुरुवातीच्या संशोधनात इन्फ्लूएन्झासारखा घातक फ्लू दूर करण्यात प्रभावी असल्याचे आढळल्यानंतर फेरेट मॉडेलच्या माध्यमातून SARS-CoV-2 चा संसर्ग रोखण्यासाठी यावर संशोधन करण्यात आले.

शास्त्रज्ञांनी हे संशोधन करण्यासाठी प्रथम काही प्राण्यांना कोरोना व्हायरसने संक्रमित केले. नाकातून या प्राण्यांनी विषाणू सोडण्यास सुरुवात करताच, MK-4482/EIDD-2801किंवा मोल्नुपीरावीर त्यांना देण्यात आल्यानंतर निरोगी प्राण्यांसोबत या संक्रमित प्राण्यांना त्याच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. संशोधनाचे सह-लेखक जोसेफ वॉल्फ यांच्या मते, संक्रमित प्राण्यांसोबत ठेवलेल्या कोणत्याही निरोगी प्राण्यांमध्ये हा संसर्ग पसरला नाही. जर त्याच मार्गाने कोरोना संक्रमित रूग्णांवर मोल्नुपीरावीर औषधाचा वापर केला गेला, तर 24 तासांच्या आत रुग्णांमधील संसर्ग संपुष्टात येईल. MK-4482/EIDD-2801 ही कोरोनासंसर्गाविरूद्ध प्रगत टप्पा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये असल्याचेही लेखकांनी सांगितले आहे.