तिसऱ्या पत्नीच्या धर्मांतराबाबत राहुल महाजनचा खुलासा


भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. राहुलने दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. राहुल नताल्या इलिना या रशियन मुलीसोबत विवाहबंधनात अडकला आहे.

आपल्या रशियन पत्नीने धर्मपरिवर्तन करत हिंदू धर्म स्वीकारल्याचा खुलासा नुकताच राहुलने केला आहे. हिंदू धर्माचा माझ्या रशियन पत्नीने स्वीकार केला असून मी देखील आता अध्यात्माच्या मार्गावर असल्याचे राहुल महाजन याने सांगितले आहे. त्याचबरोबर आम्ही दोघेही एकमेकांच्या आयुष्याचा आदर करतो. आम्ही सहसा एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. नात्यात समतोल राखण्यासाठी आम्ही एकमेकांना ती सूट दिल्याचेही राहुल सांगतो.

नताल्या रशियन असली तरी, तिने आता हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तिला मी नेहमीच शंकर आणि पार्वतीचे उदाहरण देत असतो. शंकर आणि पार्वतीसारखे आपल्या दोघांचे नाते हे असावे,असे मी तिला सांगत असतो. आम्ही एकत्र भगवद्गगीता समजून घेत असतो, अनेक आध्यात्मिक पुस्तके वाचत असल्याचे म्हणाला.

राहुलचे नताल्यापूर्वी श्वेता सिंह आणि डिम्पी गांगुली यांच्यासोबत लग्न झाले होते. परंतु या दोघींनीही राहुलवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केल्यामुळे दोघींनीही घटस्फोट घेतला होता. तसेच ड्रग्ज प्रकरणातही राहुलचे नाव समोर आले होते. दरम्यान, राहुल चॅलेंजर म्हणून बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या पर्वात सहभागी होणार आहे.