शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नकली प्रेम – भाजप


मुंबई – उद्या (८ डिसेंबर) शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी या तिन्ही पक्षाचे शेतकरी प्रेम हे नकली असल्याचा आरोप केला आहे.

ट्विटद्वारे पक्षाची भूमिका मांडताना उपाध्याय म्हणाले, बंदला पाठिंबा देणारे सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना करोना काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणती मदत केली.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झाले. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी पाठवलेले पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीले आहे, असे म्हणत केशव उपाध्याय यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला.