महाराणी एलिझाबेथला दिला जाणार फायझरच्या कोविड लसीचा डोस

फोटो साभार पब्लिक वेब

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि तिचे पती प्रिन्स फिलीप यांना फायझरच्या बायोएनटेक कोविड १९ लसीचा डोस दिला जाणार आहे. ब्रिटनने करोना लसीच्या आणीबाणी उपयोगासाठी परवानगी दिली असून अशी परवानगी देणारे ते पाहिले राष्ट्र बनले आहे. येत्या आठवड्यात ब्रिटन मध्ये करोना लसीकरण सुरु होत आहे.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात देशात ऐतिहासिक कोविड १९ लसीकरण सुरु होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून शेजारी देश बेल्जियम मधून फायझर बायोएनटेक कोविड डोस आणून जेथे लसीकरण व्हायचे आहे त्या ठिकाणी पोहोचविले गेले आहेत. सध्या ५० ठिकाणी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा रुग्णालयात लसीकरण करण्याची व्यवस्था केली गेली आहे. मंगळवार पासून पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाची सुरवात केली जात आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, ८० वर्षांवरील नागरिक, स्थानिक कामगार याना प्रथम लस दिली जाईल.

नागरिकांना लसीबाबत भीती राहू नये म्हणून ९४ वर्षीय महाराणी एलिझाबेथ आणि तिचे ९९ वर्षाचे पती प्रिन्स फिलीप यानाही लस दिली जात आहे. मात्र त्यासाठी त्यांना प्राधान्य क्रम मिळणार नाही तर लसीसाठी ज्या प्रकारे नंबर लावले गेले आहेत त्यानुसारच त्यांना नंबर आल्यावर लस दिली जाणार आहे.

डेली मेलच्या बातमीनुसार उल्लेखनीय बाब म्हणजे १९५७ मध्ये जेव्हा पोलिओचे लसीकरण सुरु झाले तेव्हा नागरिकांच्या मनातील भीती जावी म्हणून प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची बहिण प्रिन्सेस अॅन यानाही पोलिओ डोस दिले गेले होते.