या देशातील नागरिकांना रडण्याचा करावा लागतो सराव

फोटो साभार द अटलांटीक

उत्तर कोरिया आणि हुकुमशहा किम जोंग उन याच्याविषयी माहिती नाही असा माणूस विरळाच असेल. किम जोंग उनची हुकुमशाही. त्याचे अजब कायदे कानून, नागरिकांना पाळावे लागणारे अनेक विचित्र नियम यांची नेहमीच चर्चा होत असते. मिळालेल्या माहितीनुसार या देशातील नागरिकांना जोरात हंबरडे फोडून रडण्याचा सराव करावा लागतो. यामागचे कारण मजेदार आहे.

या देशात शासक मेला की नागरिकांना धाय मोकलून रडावे लागते. जे योग्य प्रकारे रडत नाहीत म्हणजे वरवर रडतात त्यांना कैद भोगावी लागते. किम जोंग उन याने २०११ मध्ये पिता किं जोंग इल यांच्या मृत्युनंतर सत्ता हाती घेतली आहे. त्याचे आजोबा किम सुंग देशाचे संस्थापक होते आणि या दोघांचे फोटो प्रत्येक नागरिकाला घरात लावणे आणि त्यांची पूजा करणे बंधनकारक आहे.

किम जोंग इल यांच्या मृत्युनंतर किम जोंग उन याने विविध ठिकाणी १० शोक सभांचे आयोजन केले होते आणि त्या प्रत्येक सभेत नागरिकांना धाय मोकलून रडण्याचे आदेश होते. १० दिवस नागरिक उर बडवून रडले पण ज्यांना हे जमले नाही अश्या हजारो लोकांना रातोरात उचलून तुरुंगात डांबले गेले. धाय मोकलून, उर बडवून रडणे हे राजावरील तुमचे प्रेम आणि वफादारी याचा पुरावा मानला जातो. त्यात लहान मुले, तरुण, म्हातारे सर्वाना सामील व्हावे लागते आणि कोण कसे रडतेय याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था असते.

रडण्याचा कार्यक्रम पार पाडला की त्याचे मूल्यमापन केले जाते आणि ज्यांना मनापासून रडणे जमले नाही त्यांना तुरुंगात टाकले जाते अशी ही प्रथा आहे.