काँग्रेससोबत युती करून मी चूक केली, जनतेच्या विश्वासाला तडा गेला – कुमारस्वामी


नवी दिल्ली – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला असून मी काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केले, पण माझ्यावर 12 वर्षांपासून जनतेचा असलेला विश्वास गमावल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने षड्यंत्र रचले आणि त्यात मी अडकल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कट रचून काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मला अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे.

एवढी मोठी फसवणूक भाजपने कधी केली नाही, जेवढी काँग्रेसने केल्याचेही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटले आहे. सध्या कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कुमारस्वामींवर सिद्धरामय्या यांनी देखील पलटवार केला आहे. खोटे बोलण्यात कुमारस्वामी माहिर असून त्यांची भावुक होऊन अश्रू वाहणे ही जुनी सवय असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर दुसरीकडे कुमारस्वामी यांनी देखील निशाणा साधला आहे.

मी 2006-07 मध्ये निवडणूक जिंकून मोठ्या कष्टाने जनतेचा विश्वास मिळवला होता. हा विश्वास जनतेने माझ्यावर 12 वर्षे दाखवला. पण काँग्रेससोबत मी युती केल्यानंतर जनतेच्या या विश्वासाला तडा गेल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती, असे देखील कुमारस्वामी यावेळी म्हणाले. युती सरकार स्थापनेवर पक्षश्रेष्ठीमुळे सहमती दर्शविली होती.

एकाच पक्षाला 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा एकमेकांविरूद्ध लढलेल्या काँग्रेस-जनता दलाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपद कुमारस्वामी यांना देण्यात आले. कुमारस्वामी खोटे बोलण्यात पटाईत असून ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटे बोलू शकतात. जनता दलाला केवळ 37 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आमची चूक झाली का? असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे.

Loading RSS Feed