ज्या ज्या ठिकाणी शहा, योगी गेले, त्या ठिकाणी भाजपचा पराभव – ओवैसी


हैदराबाद – महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग एमआयएमच्या पाठिंब्याने मोकळा होणार आहे. सत्तेपासून हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भाजपला वंचित राहावे लागले असले तरी देखील चार वरून 48 जागांपर्यंत मजल मारली आहे. तर 44 जागांवर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमला यश मिळाले आहे.

ओवैसी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या ज्या ठिकाणी अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. भाजपशी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढू. भाजपला तेलंगणाचे लोक राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील, असा आपल्याला विश्वास असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

हैदराबाद महापालिकेच्या 44 जागा आम्ही जिंकल्या आहेत. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी आपण बोलल असून शनिवारपासूनच त्यांना आपले काम सुरू करण्यास सांगितले आहे. भाजपला मिळालेले यश हे फक्त एकावेळेचे यश आहे. भाजपला हे यश तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. या निवडणुकीत आम्ही खूप मेहनत घेतली होती. तरी देखील हैदराबादच्या जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महापालिकेची निवडणूक आहे, थोडे वर-खाली होत असते. हैदराबादची जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

ज्या ठिकाणी योगी आदित्यनाथ आले होते, तेथे काय झाले? सर्जिकल स्ट्राइकबाबत ते बोलले होते. आता डेमॉक्रॅटिक स्ट्राइक भाजपवर झाला आहे. आकडे सर्वांच्या समोर आहेत. मुख्यमंत्री योगींना मी सांगेन की तुम्ही मुंबईला गेला होता. तुम्ही अभिनय नका करू. वास्तवाच्या जगात या. जे अत्याचार लोकांवर केले ते संपवा. राज्यघटनेच्या विरोधात जात लव्ह जिहाद कायदा बनवत आहात. तो रोखा, असे देखील असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.