कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला किम जोंग उन यांनी दिली मृत्युदंडाची शिक्षा


प्योंगप्यांग – जगावर ओढावलेले कोरोना संकट कमी व्हायच्या ऐवजी वाढतच आहे. अशा संकटसमयी आपल्या देशातील नागरिकांना काही नियमांचे पालन करण्यास अनेक देशांनी सांगितले आहे. याच दरम्यान, आपल्या क्रूर निर्णयामुळे कायम चर्चेत असलेल्या उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांनी आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. त्याचबरोबर नियम मोडणाऱ्याला मृत्यूदंडाचीही शिक्षा देण्यात येत आहे.

याबाबत इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कोरोनाबाबत उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी घालून दिलेले नियम मोडल्यामुळे संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित व्यक्तीने किम जोंग उन यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. फायरिंग स्क्वाडच्या हाती संबंधित व्यक्तीला सोपवण्यात आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी त्या व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्या. त्याचबरोबर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार आपल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी किम जोंग उन यांनी चीनच्या सीमनेवर अँटी एअरक्राफ्ट बंदुकाही तैनात केल्या आहेत. त्याद्वारे कोणालाही एका किलोमीटरपर्यंत गोळ्या घालता येऊ शकतात.

यासंदर्भात इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार २८ नोव्हेंबर रोजी किम जोंग उन यांनी एका व्यक्तीला कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्या व्यक्तीवर नियम मोडत चिनी सामानाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या व्यक्तीला स्थानिक सुरक्षा दलाने तस्करी करताना ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या.