ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे शेतकऱ्यांचा खटला फुकटात लढण्यासाठी तयार


नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषि विधेयकाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस असून आज पुन्हा शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि केंद्रीय मंत्री यांच्यात चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची आणि केंद्रीय मंत्र्यांची ही चर्चेची पाचवी वेळ असून कोणताही तोडगा आत्तापर्यंत झालेल्या चर्चेत निघालेला नाही. या दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील दुष्यंत दवे यांनी न्यायालयात जर हे प्रकरण गेले तर आपण या प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजुने न्यायालयात फुकटात लढण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या सदस्यांच्या बैठकीननंतर शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. कोणताही मुद्दा शेतकऱ्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडायचा असेल तर कोणत्याही फी शिवाय मी त्यांच्यावतीने न्यायालयात जाण्यासाठी तयार असून शेतकऱ्यांसोबत मी असल्याचे दुष्यंत दवे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले.