चहलच्या खेळण्यावरुन आणि जडेजाच्या दुखापतीवर मांजेरकरांचे प्रश्नचिन्ह


नवी दिल्ली – भारताने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी मात करत मालिकेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. हा विजय एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाला आवश्यक होता. कांगारुंनी टी. नटराजन आणि युजवेंद्र चहल यांच्या माऱ्यासमोर नांगी टाकली. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली असली तरीही या विजयाला वादाची किनार लाभली आहे.

जडेजाच्या हेल्मेटला फलंदाजी करताना चेंडू लागल्यामुळे Concussion Substitute च्या नियमाअंतर्गत सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी युजवेंद्र चहलला गोलंदाजी करण्याची संधी दिली. जडेजावर बीसीसीआयची वैद्यकीय टीम उपचार करत असल्यामुळे तो दुसऱ्या डावात मैदानावर उतरला नाही. आता चहलच्या खेळण्यावरुन आणि जडेजाच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांचीही यामध्ये भर पडली आहे.

चहलला कनकशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार संघात घेण्यात आले, पण हे नियमाचे उल्लंघन असल्याचे मत संजय मांजरेकर यांनी मांडले आहे. मांजरेकरांनी सामन्यादरम्यान समालोचन करताना जडेजाच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जेव्हा जडेजाच्या डोक्याला चेंडू लागला तेव्हा भारतीय संघाचे फिजिओ मैदानात का पोहचले नाहीत? असा सवाल मांजरेकरांनी यावेळी उपस्थित केला.

खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागला असतानाही फिजिओ मैदानात का आले नाहीत. प्रोटोकॉल याप्रकरणात तोडण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन भारताला मॅच रेफ्री नक्कीच प्रश्न विचारतील. एखाद्या फलंदाच्या डोक्याला चेंडू लागला असेल तर टीमचा फिजिओ तात्काळ मैदानात जाऊन फलंदाजीची दुखापत बघतो आणि प्राथमिक उपचार करतो. खेळाडूला कसे वाटत आहे, हेदेखील फिजियो विचारतो. तसेच त्याचे हेल्मेटही बदलण्यात येते. पण असे काहीही यावेळी झाले नाही आणि अजिबात वेळ न घालवता सामना सुरू राहिल्याचे वक्तव्य मांजरेकर यांनी समालोचनादरम्यान केले.

जडेजाने डोक्याला चेंडू लागल्यानंतरही ९ धावा केल्या. याचा मोठा फायदा झाला नाही. भारतीय मेडिकल टीम चेंडू लागल्यानंतर दोन-तीन मिनिटांमध्ये मैदानात यायला पाहिजे होती, असे झाले असते तर ही दुखापत विश्वसनीय दिसली असती. या नियमांबाबत आयसीसीने पुन्हा एकदा विचार करायला हवा, असे मतही मांजरेकर यांनी मांडले.