भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल – अमोल मिटकरी


अकोला : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, अशी काव्यात्मक प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर भाजपचेच अहंकारी नेतेच भाजपला कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल, अशी खोचक टीकाही मिटकरींनी केली.

महाविकास आघाडीने राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला धूळ चारली. अमोल मिटकरींनी या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्यावेळी महाविकासआघाडीला मतदान करणाऱ्यांचे आभार मानत भाजपवर हल्लाबोल चढवला. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणत भाजपची कबर खोदायला या महाविकास आघाडीने सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

कालच महाविकासआघाडीच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून यावेळी एका पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यात पाचही जागा आम्ही स्वाभिमानाने जिंकू, अजित पवारांनी असे सांगितले होते. आता महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. आजपासून भाजपच्या अदप पथनाला सुरुवात झाल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. महाविकास आघाडी येत्या निवडणुका एकत्र येऊन लढणार असल्यामुळे भाजपचेच अहंकारी नेते भाजपला कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.

निवडून आलेल्या पदवीधर आणि शिक्षक महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे मी अभिनंदन करतो, त्याचबरोबर मी मतदारांचेही आभार मानतो, अहंकाराला मतदारांनी मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या मातीने महाविकास आघाडीचा विचार स्वीकारल्याचेही अमोल मिटकरींनी सांगितले.