‘या’ राज्यात 10-12वी बोर्डाच्या परीक्षा वगळता पहिली ते आठवी शाळा 31 मार्चपर्यंत बंद


भोपाळ : कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांचा रिकव्हरी रेट जरी वाढता असला तरी नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाचा धोका लहान मुलांना जास्त आहे. महाराष्ट्रातील मुंबई वगळता अनेक ग्रामीण भागांतील 8 ते 12 वी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनातील परिस्थितीचा आढावा घेऊन मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मार्चपर्यंत मध्य प्रदेशातील पहिली ते इयत्ता 8 वी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. पाचवी ते आठवीपर्यंत शाळा बंद राहणार असून इयत्ता 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. कोरोनामुळे मध्य प्रदेशात 30 मार्च 2021 पर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु यावेळी, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे त्यांचे नियमित वर्ग आता घेण्यात येणार आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा मात्र होणार असल्याचे सांगितले आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार असल्यामुळे आता त्यांच्याकडे नियमित वर्ग असतील. शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्ये केजी वर्ग सुरू केला जाईल आणि 1500 सरकारी शाळांमध्ये केजी 1 आणि केजी 2 सुरू करण्यात येईल. तर उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल अशी देखील माहिती बैठकीदरम्यान मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.