रामसेतूचे शुटींग अयोध्येत करण्यास अक्षयकुमारला परवानगी

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याला त्याच्या आगामी रामसेतू चित्रपटाचे शुटींग अयोध्येत करण्यास परवानगी मिळाली आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि फोटो अक्षयने नुकताच शेअर केला होता. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या भेटीवर मुंबई येथे गेले होते तेव्हा अक्षय कुमार ने त्याची भेट घेतली होती त्यावेळी ही परवानगी त्याने मागितली असे समजते. अक्षयने योगींची भेट घेतल्याने चर्चेला सुरवात झाली होती पण आता या बातमीने त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

अक्षय एका वर्षात अनेक चित्रपट स्वीकारतो आणि जलद शुटींग पूर्ण करतो असा त्याचा लौकिक आहे. देशात करोना उद्रेकामुळे गेले आठ दहा महिने शुटींग ठप्प झाले होते पण लॉकडाऊन उठविण्यात आल्यापासून पुन्हा शुटींगचे गाडे रुळावर येऊ लागले आहे. अक्षयचा हा नवा चित्रपट रामसेतू खरोखर होता का हे सत्य शोधणे या कथेवर आधारलेला असून त्याचे शुटींग मे २०२१ च्या आसपास सुरु होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी अक्षयला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मा करणार आहे. पुढील वर्षात अक्षयचे अनेक चित्रपट रिलीज होणार असून त्यात पृथ्वीराज, रक्षाबंधन, सूर्यवंशी यांचा समावेश आहे.