या चिमुकल्या सैनिकांना मिळाली लडाखी नावे

फोटो साभार अमर उजाला

भारत तिबेट सीमा पोलीस दलाने (आयटीबीपी) त्यांच्या नवजात बेल्जियन मेलीनोईस लढाऊ कुत्र्यांचे नामकरण लडाख मधील काही भागावरून केले आहे. हा अनोखा निर्णय घेण्यामागे दोन उद्देश आहेत. पाहिला म्हणजे सर्वसामान्य पणे फौजी श्वानांना देण्यात येणारी सीझर, एलिझाबेथ या परकीय नावांपासून सुटका मिळावी. दुसरा उद्देश लडाखच्या दुर्गम भागात, कडाक्याच्या थंडीत आणि अतिशय प्रतिकूल हवामानात पाय घट्ट रोवून असलेल्या स्थानिक नागरिक आणि सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करावा हा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या जातीची कुत्री आंतरराष्ट्रीय चर्चेत आहेत. २०११ मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घुसून अमेरिकन नेव्हीच्या सील कमांडोनी अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला. तेथे या कुत्रांच्या मदतीनेच ओसामाचा माग काढला गेला होता असे सांगितले जाते. तेव्हापासून ही कुत्री ओसामा हंटर्स याच नावाने प्रसिध्द आहेत.

पंचकुला येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात या जातीची नऊ पिले जन्मली असून त्यांना एने-ला, गलवान, सासोमा, श्योक, चान्ग चेन्मो, चीप्चाप, दौलत, रेजांग, रंगो, चारडिंग, चुक्सू, खारदुंगी, चुंगथुंग अशी लडाख मधील वेगवेगळ्या ठिकाणांवरून नावे दिली गेली आहेत. लडाखच्या या दुर्गम भागाच्या संरक्षणाची जबाबदारी आयटीबीपी कडे आहे. यामुळे या जवानाच्या सन्मानार्थ श्वान पथकातील या छोट्या सैनिकांना ही नावे दिली गेल्याचे समजते.