नामिबियाचा अडॉल्फ हिटलर

फोटो साभार अमर उजाला

द.आफ्रिकी देश नामिबिया मधील स्थानिक निवडणूक जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे कारण  या निवडणुकीत अडॉल्फ हिटलरने मोठा विजय मिळविला आहे. अर्थात नाझी हुकुमशहा अडॉल्फ हिटलर आणि या हिटलर मध्ये नावाशिवाय अन्य काहीही साम्य नाही. हा हिटलर त्याच्या गावात अडॉल्फ उनेना नावाने प्रसिद्ध आहे.

हा ५४ वर्षीय हिटलर सत्ताधारी स्वापो पक्षाचा सदस्य आहे. त्याने ओम्पुजा विधानसभा निवडणुकीत ८५ टक्के मते मिळवून विजय मिळविला आहे. तो कौन्सिलर म्हणून निवडून आला असून जर्मन वृतपत्र बिल्ड ला दिलेल्या मुलाखतीत त्याने नाझीवादशी त्याचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. एकेकाळी नामिबिया जर्मनीचा एक भाग होता त्यामुळे नामिबियामध्ये हिटलर हे नाव असामान्य नाही.

नामिबियाचा हिटलर सांगतो त्याच्या वडिलांनी त्याचे नाव अडॉल्फ हिटलर वरूनच ठेवले आहे. मोठा झाल्यावर त्याला त्याचा खरा अर्थ कळला. पण त्या हिटलरसारखी जग जिंकायची इच्छा नसल्याचे तो सांगतो. अर्थात नाव बदलून घेण्याचा त्याचा विचार नाही कारण बहुतेक सर्व कागदपत्रात त्याचे हेच नाव नोंदले गेले आहे.