धोनीचा प्लान, शेतकऱ्यांना मोफत देणार गाई

फोटो साभार न्यूज ट्रॅॅक

टीम इंडियाचा माजी कप्तान क्रिकेट निवृत्तीनन्तर शेती व्यवसायात उतरला असल्याचे आता सर्वाना माहिती झाले आहे. धोनी लवकरच झारखंड मधील काही शेतकऱ्यांना मोफत गाई देणार असून या योजनेचे काम सुरु झाले असल्याचे समजते. रांची जवळ धोनीचे फार्म हाउस असून येथेच धोनी त्याचे शेतीचे स्वप्न साकार करत आहे. धोनीला डेन्मार्कच्या गाईप्रमाणे भरपूर दुध देणाऱ्या नवीन जातीच्या गाई शेतकऱ्यांना द्यायच्या आहेत.

यामागे या गाईच्या दुध विक्रीतून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावे आणि त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी असा उद्देश आहे. धोनीने या संदर्भात काहीही जाहीर घोषणा केलेली नाही मात्र त्याने जेव्हा जैविक शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्याच्या मनात ही कल्पना होती. धोनीचा मित्र पशुचिकित्सक असून त्याच्या देखरेखीखाली गेल्या १ वर्षापासून धोनीच्या फार्मवर गाई पाळल्या जात आहेत.

ज्या शेतकऱ्यांना धोनी गाई देणार आहे त्यांची सर्व माहिती धोनी संग्रही ठेवणार आहेच पण वेळोवेळी स्वतः जाऊन गाईंचे पालन व्यवस्थित होत आहे ना यावर लक्ष ठेवणार आहे. जेथे गाईंची आबाळ होत असेल तेथील गाई तो परत आणणार आहे. धोनीच्या फार्मवर सध्या १०५ गाई आहेत. त्या साहिवाल, पंजाब आणि काही स्थानिक जातीच्या आहेत.

धोनीच्या फार्मवरील टोमॅटो, फ्लॉवर आणि मटार सहा ठिकाणी सेंटर स्थापून तेथे विक्री केली जात आहे तसेच रोज ३०० लिटर दुध विकले जात आहे. फार्मवर मत्सपालन आणि कडकनाथ कोंबडी पालन सुद्धा केले जात आहे.