जेम्स बॉंडच्या ००७ पिस्तुलाला दोन कोटींची बोली

जेम्स बॉंडचे जगात कोट्यवधी चाहते आहेत आणि त्याचे चित्रपट, सिरीज कोट्यवधी प्रेक्षक आजही मोठ्या उत्सुकतेने पाहतात. त्याचा ००७ हा नंबर अनेकांच्या जीवाभावाचा बनला आहे. काही दिवसांपूर्वी गुजराथ मध्ये एका व्यक्तीने त्याच्या कारसाठी ००७ नंबर मिळावा म्हणून तब्बल ३४ लाख रुपये मोजल्याची बातमी अनेकांनी ऐकली असेल. आता बेवर्ली हिल्समध्ये ज्युलियन ऑक्शन तर्फे करण्यात आलेल्या लिलावात बॉंडच्या ००७ पिस्तुलला २५६००० डॉलर्स म्हणजे १ कोटी ९० लाख रुपये मिळाल्याचे समजते.

हे पिस्तुल हॉलीवूड नगरीच्या इतिहासाचा एक भाग आहे. जेम्स बॉंडच्या भूमिकेत तुफान लोकप्रियता मिळविलेल्या शॉन कॉनरीने हे पिस्तुल वापरले होते. त्याने सात जेम्स बॉंड चित्रपटात भूमिका केल्या आहेत. हे पिस्तुल म्हणजे त्याची ओळख बनले होते.  सेमी ऑटोमॅटिक वोल्थर पीपी पिस्तुलचे हे छोटे मॉडेल आहे. हीच गन कॉनरीने १९६२ मध्ये ’डॉ. नो’ चित्रपटात सर्वप्रथम वापरली होती. शॉन कॉनरीचा ३१ ऑक्टोबर २०२० रोजी वयाच्या ९० व्या वर्षी मृत्यू झाला.

हे ऐतिहासिक पिस्तुल कुणी खरेदी केले त्याचे नाव जाहीर केले गेलेले नाही. मात्र तो अमेरिकन नागरिक आहे हे सांगितले गेले आहे. या व्यक्तीने मुलाबाळासकट जेम्स बॉंडचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. या लिलावात ‘टॉप गन ‘ चित्रपटात टॉम क्रुझ याने वापरलेले हेल्मेट १०८००० डॉलर्स ला विकले गेले असून ‘पल्प फिक्शन ‘मध्ये ब्रूस विलीसने वापरलेली तलवार ३५२०० डॉलर्स ना विकली गेली आहे.