शेतकरी आंदोलन; हरियाणात काँग्रेसची खट्टर सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची घोषणा


चंदीगड: आता हरियाणात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आता हरियाणातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या रोषामुळे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, हरियाणातील खट्टर सरकारविरोधात आता काँग्रेस पक्षाने विधिमंडळात अविश्वास ठराव मांडणार असल्याची घोषणा केली आहे.

शुक्रवारी हरियाणातील काँग्रेस नेत्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस विधीमंडळ पक्षाने यावेळी विशेष अधिवेशन बोलावून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. खट्टर सरकारने सध्याची परिस्थिती पाहता जनता आणि विधानसभा दोहोंचा विश्वास गमावल्याचे वक्तव्य हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भुपिंदरसिंह हुड्डा यांनी केले.

हरियाणा सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी चूक केल्यामुळे सध्या वाईट अवस्थेत आहे. वॉटर कॅननद्वारे शेतकऱ्यांना पाण्याचा मारा करणे, शेतकऱ्यांवर अश्रुधुराची नळकांडी फोडणे हरियाणा सरकारला थांबवता आले नसते का? हरियाणा सरकारची ही कृती निषेधार्ह आहे. शेतकऱ्यांचा हरियाणा सरकारने अपमान केला असून ‘खलिस्तानी’ आणि ‘काँग्रेसी’ म्हणून आंदोलक शेतकऱ्यांना हिणवण्यात आले. आपल्या रास्त मागण्या घेऊन शेतकरी आले होते, हे आंदोलन जात, पंथ आणि प्रदेश या सगळ्यापलीकडचे होते. एवढ्या थंडीतही शेतकरी आंदोलन करत असल्याचेही भुपिंदरसिंह हुड्डा यांनी म्हटले.