हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा; चंद्रकांत पाटलांचे महाविकास आघाडीला आव्हान


पुणे – महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एका जागेवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर धुळे-नंदुरबारची एकमेव जागा भाजपला मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी नागपूर, पुणे, औरंगाबाद यासाख्या भाजपच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. या पराभवानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले आहे.

या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. एकाशी तीन पक्ष एकत्र येऊन लढल्यावर वेगळे चित्र निर्माण होत नाही. असे असूनही चांगला संघर्ष आम्ही केला आणि निकराचा लढा दिला. या निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळाले याचा त्यांनी विचार करायला हवा. अमरावतीची त्यांची जागा गेली. याउलट राष्ट्रवादीचा या निकालांमध्ये फायदा झाला. त्यांना पुणे पदवीधर, मराठावाडा पदवीधर आणि अप्रत्यक्षरित्या अमरावती शिक्षक मतदार संघात विजय मिळवता आला. या तिघांना मी आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण ती हिंमत त्यांच्यात नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.