भाजपच्या प्रवक्तत्यांनी कंगनाला खडसवले; त्या शेतकरी आजींची जाहीर माफी माग


नवी दिल्ली – पंजाब आणि हरयाणातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषि विधेयकाविरोधात आंदोलन करत आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत देखील या मुद्द्यावर सतत भाष्य करत असून ट्विटरच्या माध्यमातून या आंदोलनाचा विरोध करत आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आजींबद्दल ट्विट केले होते, त्यावरुन वाद वाढल्यानंतर ते ट्विट तिने डिलीट केले. पण, कंगनाला अजूनही त्या ट्विटवरुन प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. कंगनाच्या त्या ट्विटवर अनेक कलाकार संताप व्यक्त करत असतानाच आता भाजप नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह यांनीही यावरुन कंगनावर निशाणा साधला आहे.


आपल्या ट्विटमध्ये आरपी सिंह यांनी कंगनाला जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे. मी तुझ्या धैर्याचा आणि अभिनयाचा आदर करतो. पण, माझ्या आईचा कोणी अपमान किंवा अनादर केला तर सहन करणार नाही…त्यामुळे तू जाहीर माफी मागायला हवी, अशा आशयाचं ट्विट आरपी सिंह यांनी केले आहे. कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉटही आपल्या ट्विटसोबत सिंह यांनी जोडला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आजीबद्दल कंगनाने ट्विट केले होते. १०० रुपयांसाठी ही आजी कोणत्याही आंदोलनात जाते, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. पण नंतर होत असलेल्या टीकेमुळे तिने हे ट्विट डिलीट केले.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अभिनेत्री कंगना राणावत ही वारंवार समाजात दुही व द्वेषभावना निर्माण करणारे, सामाजिक सौहार्दता व बंधुभाव बिघडण्यास चिथावणी देणारे, विशिष्ट धर्माची प्रतिमा मलीन करणारे ट्विट करत असते. ट्विटर इन्कॉर्पोरेशन कंपनीकडे याविषयी तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नसल्यामुळे कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमचे स्थगित किंवा बंद करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच आपल्याच नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश ट्विटर इन्कॉर्पोरेशनला द्यावेत, अशी विनंतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात अॅड.अली काशिफ खान देशमुख यांनी दाखल केली आहे.