दिलजीतनंतर मिका सिंगने कंगनावर डागली टीकेची तोफ


देशातील शेतकऱ्यांचे केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषि विधेयकाविरोधात आंदोलन सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि गायक-अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यात या आंदोलनावरुन सुरू असलेल्या ट्विटर वॉरचीही बरीच चर्चा आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आजीबद्दल कंगनाने एक ट्विट केले होते. १०० रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात ही आजी जाते, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. पण त्यानंतर होत असलेल्या टीकेमुळे तिने ते ट्विट डिलीट केले. पण तिच्या या ट्विटमुळे हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

दिलजीत दोसांजने कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटवरुन तिला धारेवर धरत चांगलेच खडेबोल सुनावल्यानंतर आता कंगनाविरोधात गायक मिका सिंग यानेही संताप व्यक्त केला आहे. तुला थोडी तरी लाज वाटायला हवी होती आणि तुझ्यात आता ही थोडे फार शिष्टाचार असतील तर त्या शेतकरी आजींची माफी माग, असे मिका सिंगने म्हटले आहे.


आपल्या ट्विटर अकाउंटवरुन मिकाने दोन वृद्ध आजींचा फोटो शेअर केला आहे. कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉटही त्या फोटोवर आहे. मिकाने या ट्विटसोबत, कंगनासाठी माझ्या मनात खूप आदर होता. ज्यावेळी तिच्या ऑफिसवर महानगरपालिकेने कारवाई केली होती त्यावेळी तिच्या समर्थनार्थ मी ट्विटही केले होते. पण आता मला असे वाटत आहे की त्यावेळी मी चुकीचा होतो. कंगना स्वतः एक महिला असल्यामुळे तू त्या वृद्ध महिलेबद्दल थोडातरी आदर ठेवायला हवा. लाज वाटली पाहिजे तुला.. आणि तुझ्यात थोडे फार शिष्टाचार असतील तर त्या आजींची माफी माग, अशी संतप्त प्रतिक्रिया मिकाने दिली आहे.